महापालिका निवडणुकीत अव्यवस्था, ठाण्यात उमेदवार रांगेत ताटकळले..
ठाणे : बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर न करता सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दुपारपर्यंत एबी फॉर्मचे वाटप सुरू ठेवले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध शहरांमध्ये उभारलेल्या यंत्रणांवर मोठा ताण आला. दुपारी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी गेलेले अनेक उमेदवार रात्री उशिरा अर्ज भरून बाहेर पडले. या काळात अनेकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय मिळाली नाही. प्रचंड गर्दीमुळे बसायला जागा नव्हती. रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू असल्याने कर्मचारी, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले.
एबी फॉर्म मिळवण्यासाठी अनेक उमेदवार रात्रभर पक्ष कार्यालयात थांबले होते. शिंदेसेनेकडून दुपारी दीड वाजेपर्यंत उमेदवारांना एबी फॉर्मसाठी थांबवण्यात आले. एबी फॉर्म मिळाल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार अनेकांनी शक्तिप्रदर्शनाच्या मिरवणुका काढल्या. एकाच प्रभागातील प्रतिस्पर्धी उमेदवार समोरासमोर येऊ नयेत यासाठी पोलिसांना विशेष खबरदारी घ्यावी लागली. त्यामुळे निवडणूक कार्यालयांबाहेर मोठी गर्दी झाली.
ज्यांना मंगळवार रात्री उशिरा अर्ज मिळाले, त्यांनी बुधवारी सकाळीच प्रभाग समिती कार्यालय गाठले. वाजत-गाजत, फटाके फोडत अनेकांनी अर्ज दाखल केले. मात्र, एकाच दिवशी शेकडो उमेदवार अर्ज भरण्यास आल्याने निवडणूक काम पाहणारे अधिकारी आणि कर्मचारी पुरते हैराण झाले.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेने वेगवेगळ्या प्रभाग कार्यालयांत अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म वाटप टाळल्याने महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोलमडली.
अनेक उमेदवारांना दुपारचे जेवणही करता आले नाही. महानगरपालिकेकडून पिण्याचे पाणी किंवा बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने उमेदवारांना तीन ते पाच तास रांगेत उभे राहावे लागले.
काही उमेदवार लहान मुलांना घेऊन आले होते. त्यामुळे त्यांचे मोठे हाल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी एका उमेदवाराला तासन्तास थांबावे लागत होते. काही ठिकाणी काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने उमेदवारांचा संयम सुटला. काही ठिकाणी उमेदवारांचे समर्थक आणि निवडणूक कर्मचारी यांच्यात वादही झाले.
दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारायचे होते. मात्र अर्जदारांची संख्या प्रचंड असल्याने रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू राहिली. वर्तकनगर भागातील जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये असलेल्या निवडणूक कार्यालयात उमेदवारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. येथे पंखा, पाणी किंवा बसण्याची कोणतीही सुविधा नव्हती.
What's Your Reaction?