Thane–KDMC Election 2026 : महायुतीत पहिली ठिणगी, ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांचा युतीला विरोध
Thane–KDMC Election 2026 : महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला असून पक्षांतरं आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महायुतीतील वादाची पहिली ठिणगी ठाण्यात पडल्याचं चित्र आहे. शिवसेना–भाजप युती म्हणून महापालिका निवडणुका एकत्र लढवण्यात येणार असल्या तरी स्थानिक पातळीवर नाराजी उफाळून आली आहे.
नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवणारी शिवसेना व भाजप राज्यातील महापालिका निवडणुका मात्र महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांचा हा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात युतीविरोधात पहिली ठिणगी पडली आहे.
भाजप कोपरी मंडळाच्या वतीने शिवसेनेशी युती करण्यास हरकत नोंदवण्यात आली आहे. कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेंच्या शिवसेनेकडून यापूर्वी झालेल्या कुरघोडींचा पाढाच वाचून दाखवला. यासंदर्भातील निवेदन ठाणे निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर, आमदार अॅड. निरंजन डावखरे तसेच भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे युतीत नाराजीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सचिन पोटे यांनी वरिष्ठांचा दबाव आणि पक्षातील नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त करत यापूर्वी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच मनसेचे नेते कौस्तुभ देसाई आणि त्यांची पत्नी कस्तुरी देसाई हेही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत आज मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होण्याची चिन्हं आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी पाहायला मिळणार आहेत. कल्याण-डोंबिवली हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केडीएमसी आणि ठाण्यात शिवसेना–भाजप युती खरंच एकदिलाने काम करणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांना रोखणं हेच महायुतीचं प्रमुख लक्ष्य असल्याचं बोललं जात आहे.
What's Your Reaction?